काँग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ देण्यासारखं; बाळासाहेब थोरातांची ममतादीदींवर टीका
अहमदनगर: काँग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ देणं आहे. काँग्रेसला डावलून कुणालाही पुढे जाता येणार नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. काँग्रेस पक्ष नाहीतर विचार आहे अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे.
काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपविरोधातील आघाडीबाबत सामनाच्या अग्रलेखाचे समर्थन थोरात यांनी केलं आहे. काँग्रेस हा जनमाणसातील राष्ट्रीय पक्ष आहे. तसेच काँग्रेस हा केवळ पक्ष नाहीतर विचार असल्याचेही थोरात म्हणाले. काँग्रेस हा राज्यघटनेशी निगडीत असल्यामुळे तो शाश्वत पद्धतीनेच राहणार, वाईट दिवस येतील जातील पण तत्वज्ञान डावललं जाऊ शकत नाही. काँग्रेसला डावलणं म्हणजे विचारांना डावलणं आहे. या विचारांना डावलणं म्हणझे फॅसिस्टवृत्तीला ताकद देण्यासारखे आहे. अशा शब्दात थोरात यांनी ममतांवर हल्लाबोल केला आहे.
आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत की, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार आहे. अध्यक्षपदावरुन आघाडीमध्ये कोणताही तिढा नाही आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच यावेळी आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.