पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हात तर नाही ना? नाना पटोलेंनी व्यक्त केली शंका

मुंबई: पंजाबमधील फिरोजपूर येथील होणारी भाजपची रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे अचानक रद्द करण्यात आली. यामुळे देशभरात राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. तसेच मोदींच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमागील घटनेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शाह यांचा हात तर नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. असं करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितलं पाहिजे, अशा शंका पटोले यांनी उपस्थित केल्या.

पाच राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी नौटंकी सुरू आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई बेरोजगारी जनतेचे प्रश्न यावरील विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीने काम करत असते. पंतप्रधान रोज अनेक रुप बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केलं. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरू असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी व्हावं, असंही ते म्हणाले.