अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

35

मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुद्धा विरोधक आक्रमक बघायला मिळाला आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन शिदे सरकार आणि ईडी कारवाई विरोधात जोरदार घोषणा बाजी केली आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, नितीन राऊत, नाना पटोले आदी उपस्थित होते. मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्तांना सरकारची मदत मिळाली पाहिजे, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीतील नेते आज एकत्र आले. यावेळी सरकारविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, ईडी सरकार हाय हाय , लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो आदी घोषणा करण्यात आल्या. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह मविआतील नेत्यांचा समावेश होता.

महाराष्ट्रातील नव्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन आहे. काल पहिल्या दिवशी बुधवारी 25 हजार 826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यातील नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली. महापालिकांच्या क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासाकरिता तसेच नगरपालिकांसाठी विशेष अनुदान म्हणून 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुरवणी मागण्यांमध्ये सहकार, पणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, गृह, नगरविकास महिला आणि बालविकास तसेच ग्रामविकास या खात्यांसाठीही तरतूद करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.