अखेर ठरलं! हिवाळी अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक

मुंबई: विधानसभेतील अध्यक्ष पद अद्याप रिक्त आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप अध्यक्षाची निवड झालेली नाही. दोन अधिवेशन हे अध्यक्षपदाविना झाले. मात्र, यावेळेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदावर भाष्य केलं. या वेळेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, असं थोरात म्हणाले. अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे, याबाबत थोरात यांनी सांगण्यास नकार दिला. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अध्यक्षपदाच्या नावासाठी निर्णय होईल, असं थोरात यांनी सांगितलं.

येत्या २२ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही निवडणूक गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे . विधानसभा नियम समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम बदलण्याचा निर्णय झाला असून आता आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नियम बदलाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचेही कळते.