पेपरफुटी प्रकरण: आरोग्य विभाग मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक; पुणे सायबर पोलिसांची कारवाई

4

पुणे: लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनीच आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचे उघडकीस आले आहे. बडगिरे याने त्याच्या विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचार्‍याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर फोडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानंतर हा पेपर राज्यभर व्हायरल करण्यात आला.

पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी सात जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 11 झालीय. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत लातूरमधील आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी, बीडच्या मनोरुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी, उस्मानाबाद आरोग्य विभागाचा क्लार्क आणि एक शिपाई यांना अटक केली आहे. लातूरच्या सीईओने पेपर फोडला आणि इतर सर्वांचा या पेपरफुटीच्या प्रकरणात समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ या वर्गासाठी 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेला पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ परीक्षेचा पेपर परीक्षेआधी पेपर फोडून 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.