ओमायक्रॉनचा विदर्भात शिरकाव! नागपुरात आढळला पहिला रुग्ण

नागपूर: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या राज्यात हळूहळू वाढत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता विदर्भात देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. नागपूरमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला आहे. या रुग्णावर शहरातील खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यात कल्याण डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्णा आढळून आला होता. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई देखील ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले. मात्र आता राज्यात कोरोनाचा नवा विषाणू हळूहळू पसरतोय. आता विदर्भात देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. नागपूरमध्ये आज आढळेला रुग्ण 40 वर्षांचा असून त्याला प्रवासाचा इतिहास आहे.

ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून ही व्यक्ती प्रवास करुन 8 दिवसांपूर्वी भारतात आली होती. या व्यक्तीची टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ओमायक्रॉनची बाधा झाली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी या रुग्णाचे नमूने ‘जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. आज त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून रिपोर्टमध्ये रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. दिलासादायक बाब म्हणजेच रुग्णाच्या कुटुंबियांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आहे.