१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा सुरू!

22

मुंबई: करोनाची साथ सुरू झाल्यानंतर बंद झालेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत होत्या. मात्र जानेवारी महिन्यात तिसऱ्या लाटेच्या भीतीने पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या होत्या. या शाळा आता पुन्हा आज, सोमवारपासून सुरू होत आहेत. आजपासून पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू होत असल्याने आतापर्यंत शाळेत पाऊल न ठेवलेले विद्यार्थी प्रथमच शाळेत जाण्यास उत्सुक आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील प्रमुख शहरांतील शाळा ३ जानेवारीपासून अणि त्यानंतर ग्रामीण भागातील शाळा या बंद करून त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू करत सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावरून नाराजी आणि विरोध झाला. रुग्णसंख्या कमी होत असल्याने शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी पालक, स्वयंसेवी संस्था व शिक्षणतज्ज्ञांनी केली होती. त्यानंतर शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्यानंतर त्याला सरकारने हिरवा कंदील दिला व त्यानंतर राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू होत आहेत.

काही शहरांत शाळा सुरू करण्यासाठी आम्ही स्थानिक स्तरावर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. सध्याची परिस्थिती आणि मार्गदर्शक सूचना पाळण्याचे आदेश देत आयुक्तांनी सोमवारपासून मुंबईतील सर्व व्यवस्थापन व मंडळाच्या शाळांचे पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईतील सर्व माध्यमाच्या शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे.

नाशिक शहरातील शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. ग्रामीण भागातील शाळा १०० टक्के क्षमेतेने, तर शहरातील शाळा ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १३ दिवसांच्या सुटीनंतर आज पुन्हा एकदा शहरातील पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू होणार आहेत. शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह जवळपास सर्वच खासगी शाळांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील करोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तरी सद्य:स्थितीत करोना संसर्गाचा प्रादुर्भोव कमी होईपर्यंत शहरातील शाळा सुरु करु नयेत अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.