लातूरनंतर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण
मुंबई: राज्याची काळजी वाढवणारी बातमी आहे. राज्यात कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनच्या आणखी दोन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूरनंतर मराठवाड्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. लातूरनंतर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत.
दुबईहून आलेल्या एका 42 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली. तर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचाही रिपोर्ट ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. ही बाधित व्यक्ती उस्मानाबादच्या बावीत गावातील रहिवासी असून गावात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
शारजाहून भारतात आल्यानंतर या व्यक्तिची विमानतळावरच तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने चार दिवसांपूर्वी त्यांची चाचणी घेतली होती. आरोग्य विभागाने वर्षीय व्यक्तीसह त्याच्या कुटूंबातील 5 जणांचे सॅम्पल पुण्याच्या नॅशनल व्हायरालॉजी इन्स्टिट्युटला तपासणीसाठी पाठविले होते. काल(बुधवारी) या दोघांचाही अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
ओमायक्रॉनची लागण झालेले दोघे रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याचं कळतंय. यामुळे प्रशासनाने तातडीने खबरदारी घेत गावात कलम 144 लागू केले आहे. गावातून इतर ठिकाणी संसर्ग होऊ नये यासाठी बावी गावातील सीमा सील केल्या आहेत. संसर्ग वाढणार नाही याची प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य ती काळजी घ्यावी आणि कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.