ओबीसीला आरक्षण न मिळण्यासाठी भाजपाच जबाबदार –एकनाथ खडसे

जळगाव: आगामी 21 डिसेंबरच्या 105 नगरपंचायतीच्या निवडणुका, आता 27 % ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. कारण ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला झटका बसला आहे. त्यामुळे 21 डिसेंबरच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत.

राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका करण्यात आली होती. ज्यात केंद्र सरकारनं राज्य सरकारला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा द्यावा आणि तसे निर्देश कोर्टानं केंद्राला द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं ही हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेला निकाल हा दुर्दैवी असून, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र केंद्राने जर राज्य सरकारला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा दिला असता, तर त्यात राज्य सरकारने दुरुस्त्या केल्या असत्या. नव्या दुरुस्त्यांच्या आधारे आरक्षणाबाबत निर्णय घेता आला असता.

मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील केंद्राने राज्याला इम्पेरिकल डेटा दिला नाही. केंद्रामुळे ओबीसींवर ही वेळ आल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या हक्काचे आरक्षण आहे. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी मध्यस्थिने मार्ग काढावा असे देखील खडसे यांनी म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!