देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या 325 वर, महाराष्ट्रात सर्वाधित 88 रुग्ण

मुंबई: कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने देशाची चिंता वाढवली आहे. देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिवसेंदिवस अनेक ओमिक्रॉनबाधित रुग्ण सापडत आहेत. ओमिक्रॉनचा वाढता धोका रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा देखील कामाला लागली आहे. उच्चस्तरीय बैठका घेऊन अनेक उपाय योजना आखल्या जात आहे. त्याचसोबत अनेक राज्यात नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे. याच दरम्यान ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळण्याचा एक धक्कादायक आकडा समोर आला आहे. देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 325वर गेली आहे.

देशामध्ये गुरुवारी आणखी 64 नवे ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये 33, तेलंगणामध्ये 14, कर्नाटकात 12, केरळमध्ये 5 नवीन ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 325 वर पोहचली आहे. देशामध्ये ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे. आतापर्यंत 16 राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमध्ये ओमिक्रॉनने हातपाय पसरले आहेत. तर महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 23 नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे बाधितांची संख्या 88 वर पोहचली आहे. महत्वाचे म्हणजे देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा देखील वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 7,495 नवे रुग्ण आढळले आहेत तर 434 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 कोटी 47 लाख 65 हजार 976 झाला आहे तर 3 कोटी 42 लाख 8 हजार 926 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्ये देशामध्ये 78 हजार 291 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. देशामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 78 हजार 759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.