परीक्षा घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार तुकाराम सुपेच्या घरात आणखी सापडले घबाड

पुणे: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी या प्रकरणी अधिक खोलवर तपास करण्यास सुरूवात केली असून, याप्रकरणी अटकेत असलेला तुकाराम सुपेकडे मोठे घबाड सापडतांना दिसून येत आहे. शुक्रवारी सुपेकडे 24 तासांत पुन्हा एकदा 58 लाख रूपये सापडल्यामुळे खळबळ उडाली. सुपेकडे अजून किती घबाड आहे, याचा पोलिस शोध घेत आहे.

टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या परिचिताकडून काल रात्री 25 लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर आणखी एकदा त्याच्या कार्यालयावर छापा टाकत पुणे पोलिसांनी 33 लाख रुपये जप्त केले आहेत. पुणे पोलिसांना 24 तासात तुकाराम सुपेकडून 58 लाख रुपये जप्त करण्यात यश आलं आहे. यापूर्वी एक कोटी 58 लाख आणि 90 लाख सुपेकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आले होते. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत 3 कोटी 87 लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेची आणखी चौकशी केली असता त्याला पैसे लपवण्यात त्याची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी मदत केल्याचे समोर आले होते. पुणे पोलिसांनी यानंतर त्या दोघांना चौकशीला बोलावले. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी करुन छापा टाकून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि 70 लाखांचे सोनं हस्तगत केले होते.

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेला अटक केल्यानंतर त्याच्या घरी पहिला छापा टाकला होता. त्यावेळी सुपेच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितले होते. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी जी.ए सॉफ्टवेअर कंपनीच्या दोन कर्मचार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा हिंजवडीतून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोघांची सायबर शाखेत चौकशी सुरु आहे.