ग्रामीण भागातील रुग्णालयात लवकरच एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन लावणार- राजेश टोपे
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. अशा स्थितीत राज्यातील ग्रामीण रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. अनेक इमारती जीर्ण झाल्या असून तेथील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रिया यंत्रणा नाहीत, अशी गंभीर बाब लक्षवेधीच्या माध्यमातून अनेक सदस्यांनी विधान परिषदेच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामीण रुग्णालयासंदर्भात निविदा काढून मंजुरी दिली. येत्या दोन महिन्यांत सर्व रुग्णालयांची स्थिती सुधारुन लवकरच सिटीस्कॅन, सोनोग्राफी आणि एमआरआय मशीन बसवण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात २३ जिल्हा, ८ सामान्य रुग्णालय रुग्णालये आहेत. ३० ते १०० खाटा असलेली ४५० उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये आहेत. तसेच १८२८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १० हजार ६६८ उपकेंद्राद्वारे आरोग्य सेवा दिली जाते. अर्धवट बांधकामे, बंद पडलेली आरोग्य तपासणी यंत्रे, डॉक्टर, कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त जागा, रुग्णवाहिकांचा अभाव आहे. राज्याच्या आरोग्य सेवेच्या रुग्णालयांसाठी गेल्या वर्षी २५० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. खासगी भागीदारी तत्वावर दिलेल्या रुग्णालयांचीही दुरावस्था झाल्याची बाब, सदस्य रणजीत पाटील यांनी लक्षवेधी मांडली. शासकीय रुग्णालयात आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. एमआरआयसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. कर्करोग उपचारासाठी वैद्यकीय उपकरणे नाहीत.
राज्य शासनाने तीन महिन्यांत एमआरआय मशीन उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. परंतु, अद्याप कोणत्याही मशीन रुग्णालयांना दिलेल्या नाहीत. त्या कधी आणि केव्हा सुरू होणार आहेत. राज्य शासनाने रिक्त पदांची पदे भरण्याऐवजी यंत्रणा खरेदीवर भर द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. महाराष्ट्र शंभर टक्के विमा योजना युनिव्हर्सल कवर असणारे एकमेव राज्य आहे. रुग्णालयीन यंत्रणा खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. येत्या दोन महिन्यात सर्व जल्हा रुग्णालाक एमआरआय, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी मशिन दिल्या जातील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.