महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण

मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन करणारे वेगवेगळ्या पक्षातील अनेक नेते वेगवेगळ्या लग्न समारंभांना उपस्थित राहून नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यातच मंगळवारी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नात उपस्थित अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. बाळकृष्ण विखे पाटील, स्वत: हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ आता मंत्री बाळासाहेब थोरात देखील कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आहे. बाळासाहेब थोरात विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील सहभागी होते.
मंगळवारी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमात राजकारणापासून ते वेगवेळ्या क्षेत्रापर्यंत अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यानंतर आज स्वत: हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी स्वत: आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.” असं आवाहन त्यांनी सर्वांना केलं आहे.
हर्षवर्धन पाटील यांची कन्या तथा बावडा लाखेवाडी ( ता. इंदापूर ) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांचा पुण्यात मध्ये निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी दि.२८ डिसेंबर रोजी विवाह झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.