केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई: राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका वाढताना पाहायला मिळत आहे. अशातच राजकीय मंडळींना देखील कोरोनाची लागण झाल्याने सत्र सुरुच आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली असता, त्यात त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भारती पवार यांनी सलग दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा केल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता.

डॉ. भारती पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार हे दोघेही सलग दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. या दरम्यानच खासदार गोडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज भारती पवार यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन राज्यात वेगाने पसरत आहे. देशातील 24 राज्यांमध्ये आतापर्यंत 2 हजार 135 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 828 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. तर राजस्थानमध्ये ओमायक्रॉनमुळे एका जणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात असून, राज्यात आतापर्यंत 653 ओमायक्रॉन रुग्ण आढळले असून, त्यातील 259 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.