महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला पुणे पोलिसांकडून अटक
पुणे: महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. छत्तीसगड पोलिसांनी या प्रकरणी कालीचरण महाराजाला 30 डिसेंबर रोजी अटक केली. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी आज छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरण महाराजाचा ताबा घेतला आहे. महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केल्याप्रकरणी कालीचरण महाराजाविरुद्ध विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
पुण्यातही कालीचरण महाराजाच्या भाषणाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. याचप्रकरणी कालीचरण महाराजाचा ट्रान्झिट रिमांड महाराष्ट्र पोलिसांनी रायपूर न्यायालयाकडे मागितला होता. त्यानुसार कालीचरण महाराजला पुणे पोलिसांनी रायपूरमधून ताब्यात घेतलं असून यापूर्वी त्याच्याविरोधात पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कालीचरण महाराज याला दुपारी पुण्यात आणलं जाणार आहे.
Maharashtra Police took custody of religious leader Kalicharan from Chhattisgarh Police after a court in Raipur granted his transit remand yesterday
He will be produced before a court in Pune today in hate speech case
(File photo) pic.twitter.com/9tyV98B2Oj
— ANI (@ANI) January 5, 2022
पुण्यातील एका मेळाव्यात महात्मा गांधीविरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्या कालीचरण महाराजाचे नाव वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये असल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी भूपेंद्र कुमार वासणीकर यांनी महाराजाची महाराष्ट्र पोलिसांची कोठडी मंजूर केली आहे. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी महाराजाला 6 जानेवारीला पुणे न्यायालयात हजर करण्याचे आदेश प्रशासन आणि पोलिसांना दिले आहेत.
कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग याला छत्तीसगड पोलिसांनी खजुरोही येथील बागेश्वर धाम येथील घरातून अटक केली होती. २६ डिसेंबर रोजी रायपूरमधील टिकरापारा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत कलम ५०५(२) ( शत्रुत्व, द्वेष किंवा दुर्भावना निर्माण करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणारी विधाने) आणि २९४ (अश्लील कृत्ये) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कलम १२४ (ए) (देशद्रोह) आणि आयपीसीची इतर चार कलमे जोडली आहेत. आता उत्तराखंडमधील रायपूर पोलिसांकडून कालीचरण महाराजला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
छत्तीसगडच्या रायपुर येथील धर्मसंसदेच्या जाहीर कार्यक्रमात कालीचरण महाराजाने महात्मा गांधींना शिवीगाळ करत गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचे कौतुक केले. या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना कालीचरण महाराजांनी नवा व्हिडीओ शेअर करत आता आगीत तेल टाकण्याचे काम केले. कालीचरण महाराजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ करण्याच्या वक्तव्यावरुन सभागृहात विरोधक आणि सत्ताधारीदेखील आमनेसामने आले होते. कालीचरण महाराजाने महात्मा गांधींवर वंशवाद पसरवल्याचे आरोप करत काँग्रेसने त्याला अधिक खतपाणी घातल्याचे म्हटले आहे. यावेळी कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींप्रति द्वेषपूर्ण शब्दांचा वापर करत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जागी जर सरदार वल्लभभाई पटेल सत्तेवर तर भारत अमेरिकेच्याही पुढे असता असे म्हटले आहे. तर देश आर्थिक दृष्ट्या आघाडीवर असता असे म्हटले.