आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, ६० वर्षांवरील नागरिकांना आजपासून ‘बूस्टर डोस’
मुंबई: देशात कोरोनाच्या ओमायक्रॉनमुळे व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. कोरोनाची तिसरी लाट देशात धडकली असून सरकारकडून निर्बंधासारखे पाऊलं उचलण्यात आली आहे. आजपासून फ्रन्टलाईन वर्कर्स (फ्रन्टलाईन वर्कर्समध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे) आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, जे लोक बूस्टर डोस घ्यायला जाणार आहेत. त्यांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिलेली लसच पुन्हा द्यावी. म्हणजे जर तुम्ही कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तुम्हाला बूस्टर डोसही कोविशील्ड लसीचा घ्यावा लागेल.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बूस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करणं गरजेचे नाही. त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. सुरुवातीला ते कोविन अॅपवर जाऊन वेळ घेऊ शकतात. या अॅपवर बूस्टर डोसची वेगळा पर्याय दिला आहे. त्याठिकाणी सुलभपणे तुम्ही वेळ घेऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर जात लसीकरण करुन घेऊ शकता. त्याठिकाणीही दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
जर तुम्ही कोरोना लसीचा दुसरा डोस ९ महिन्यापूर्वी घेतला आहे. तर बुस्टर डोस घेऊ शकता. जर दुसरा डोस घेऊन ९ महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर बूस्टर डोससाठी वाट पाहावी लागेल. जर तुमचं वय ६० वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही इतर आजाराने त्रस्त आहात तर विना रजिस्ट्रेशन अथवा प्रमाणपत्र लसीचा डोस घेऊ शकतो. परंतु आरोग्य मंत्रालयाने तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगितले आहे.