मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात लवकरच निर्णय घेणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

28

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात पाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे लक्षात घेता यासंदर्भात शासनस्तरावर नुकसान ग्रस्तांना लवकरच भरपाई देणार असल्याची ग्वाही आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प अचानक फुटल्याने झालेल्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याबाबतची बैठक पार पडली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.या बैठकीला आमदार प्रकाश आंबिटकर हे दूरदृश्यप्रणालीव्दारे तर मदत व पुनर्वसनचे प्रधानसचिव असिमकुमार गुप्ता,मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर्ण क्षमतेने लघु पाटबंधारे प्रकल्प भरलेले होते.तसेच मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पात १ सप्टेंबर २०२१ रोजी गळती सुरू झाली या पाणीगळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी याबाबतीत सर्व वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्राप्त असून प्राप्त पंचनामे तसेच माहितीनुसार आपद्ग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

आमदार प्रकाश आंबिटकर म्हणाले,जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेला होता. तो १ सप्टेंबर २०२१ रोजी या धरणाला गळती सुरू झाली. या धरणफुटीमुळे शेतक-यांचे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पाणी विसर्गामुळे या पंचक्रोशीमधील शेकडो एकर जमीन खरबडून गेली.पाण्याच्या गाळामुळे विहिरी, मोटारपंप, पाईपलाईन, विजेचे खांब,ट्रान्सफार्मर यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कालावधीत २० ते २५ खेड्यांचे दळणवळण पुर्णपणे ठप्प्‍ होते.यामध्ये दुधाळ जनावरे ही मृत पावले असून एक महिला मृत्यूमुखी पडली आहे.या आपद्ग्रस्तांना तातडीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी बैठकीत केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.