आशिष शेलार, किशोरी पेडणेकरांनी सामंजस्याने वाद मिटवावा; हायकोर्टाचा सल्ला

23

मुंबई: महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यामुळे भाजप नेते अ‍ॅड. आशिष शेलार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील एका दुर्घटनेवरुन आशिष शेलार यांनी पालिका प्रशासन आणि महापौरांवर गंभीर शब्दात टीका केली होती. याप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच राज्य महिला आयोगाकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली. आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र मुंबई हायकोर्टाने आज हे प्रकरण आशिष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी सामंजस्याने घेत वाद मिटवण्याचा सल्ला दिला आहे.

भाजप नेते आशिष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकर हे दोघेही प्रतिष्ठित आणि जबाबदार नेते आहेत. असं म्हणत मुंबई हायकोर्टाने दोघा प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे. तसेच यावर महापौर आणि सरकारला २ आठवड्यात आपली भूमिका सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वरळीतील बीडीडी सिलेंडर स्फोट दुर्घटनेवर मत व्यक्त करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या दुर्घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला तर बाळानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. मात्र मुंबईच्या महापौर ७२ तास उलटून गेल्यानंतरही रुग्णालयात पोहोचल्या नाहीत. याच मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी महापौरांवर गंभीर टीका केली.

नायर रुग्णालयात दुर्घटनेतील जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना असेच ठेवण्यात आले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले नाहीत की त्यांची विचारपूस झाली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार टाळकं फिरवणारा आहे. त्यामुळे जनतेच्या मनातलाच प्रश्न आम्ही विचारतोय की मुंबई महापालिकेत चाललंय काय? सिलिंडर स्फोटाच्या ७२ तासांनंतर मुंबईच्या महापौर त्याठिकाणी पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केल होतं.

महापौरांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अटकेपासून सुटका करण्यासाठी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांची हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणाची सध्या मुंबईत हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.