कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम शिंदे मोठा धक्का
अहमदनगर: कर्जत नगरपंचायतीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १२ तर काँग्रेसने ३ जागा जिंकून सत्ता काबीज केली. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना दिलेला दुसरा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी एकही जागा न मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने मात्र आपले स्थान जवळपास कायम टिकवून ठेवण्यात यश मिळविले असून भाजपला मोठा फटका बसला आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध मिळविली होती. त्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाचा वाद होऊन त्या जागांवरील निवडणूक स्थगित झाली. ती खुल्या प्रवर्गात समाविष्ठ करून पुन्हा घेण्यात आली. अशा १६ जागांसाठी आज मतमोजणी झाली. सुरवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली गेली. पवार यांचे वर्चस्व आणि शिंदे यांचे अस्तित्व या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. यापूर्वी नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. १७ पैकी १३ जागा भाजपला तर चार जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपंचायतीत खातेही उघडता आले नव्हते. पुढे विधानसभेत भाजपचे शिंदे यांचा परभाव करून आमदार पवार विजयी झाले. तेव्हापासून या मतदारसंघातील समीकरणे बदलत आहेत.
नगरपंचायतीच्या तोंडावरच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांची साथ सोडून पवार यांच्या गोटात सहभागी झाले. त्यामुळे भाजपला नवख्या उमेदवारांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागली. प्रचारात विविध मुद्द्यांवर आरोपप्रत्यारोप झाले. भाजपकडून पवार यांच्यावर दडपशाहीचा आरोप करून आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.