रोहित पाटलांची कवठेमहांकाळमध्ये एकहाती सत्ता, 17 पैकी 10 जागा जिंकल्या

कवठे महंकाळ: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील  यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.

रोहित पाटील यांचं प्रचारातलं हे भाषण चर्चेत होतं.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठीच्या प्रचाराची सांगता करताना रोहित पाटील यांनी, “निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही,” अशी घोषणा केली होती.  मी कवठेमहांकाळचा परिसर फिरलो असून विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे मला माहित आहे. मला बालीश म्हणायचं आणि शहरातल्या नेत्यांनी माझ्यावरच बोलत रहायचं ही वेळ त्यांच्यावर आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता.