देश असाच उध्वस्त नाही झाला, त्यासाठी मोदींनी १८-१८ तास विश्रांती न घेता काम केले आहे; भाई जगताप यांची खोचक टीका

14

मुंबई: मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे नेहमीच त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत येत असतात. भाई जगताप हे वेगवेगळ्या पद्धतीने भाजपवर टीका करत असतात. अनेकदा ते मोदींच्या कामांवरुनही त्यांच्यावर निशाणा साधत असतात. आताही पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी १८-१८ तास काम करतात, असे म्हटले जाते. याबद्दल अनेकदा भाजप पक्षातील नेते उघडपणे बोलताना दिसतात. आता याचाच संदर्भ घेत भाई जगताप यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये, देश असाच उध्वस्त नाही झाला त्यासाठी पंतप्रधानांनी १८-१८ तास काम केले आहे, असे भाई जगताप यांनी म्हटले आहे. देश असाच उध्वस्त नाही झाला आहे… त्यासाठी कोणीतरी १८-१८ तास विश्रांती न घेता, कामातून सुट्टी न घेता काम केले आहे. त्यामुळेच तर हे शक्य झाले आहे, अशा आशयाचे ट्विट करत भाई जपताप यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

भाई जगताप यांनी हे ट्विट हिंदीमध्ये केले आहे. ऐसे ही बर्बाद नही हुवा है देश… किसीने १८-१८ घंटे बिना आराम किये, बिना छुट्टी लिए काम किया.. तब मुमकिन हुवा है ये..!! , असे ट्विट भाई जगताप यांनी केले आहे. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मोदी भाषण देत असताना टेलिप्रॉम्प्टर अचानक बंद पडला होता. त्यामुळे नरेंद्र मोदी भाषणात गोंधळून गेले होते. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

पंतप्रधान मोदी गोंधळून गेल्यामुळे सोशल मीडियासोबत काँग्रेस नेत्यांकडून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. याबाबतही भाई जगताप यांनी ट्विट केले होते. आता टेलिप्रॉम्टर चालवणाऱ्याची नोकरी फक्त देव वाचवू शकतो, असे भाई जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.