गेल्या ५० वर्षांपासून शरद पवारांनी कर्मचाऱ्यांचा घातच केलाय; पडळकरांचा हल्लाबोल

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आज, गुरुवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस गेले होते. यादरम्यान विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर फडणवीसांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली.

फडणवीसांच्या भेटीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ‘जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. गेल्या ५० वर्षांपासून शरद पवारांनी कर्मचाऱ्यांचा घातच केलाय,’ असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल आम्ही विनंती केली होती की, गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचारी थंडी, पावसात, उन्हात बसले आहेत. २८ तारखेच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. सरकार याबाबतीत सकारात्मक चर्चा करत नाही. आमचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येतंय, आम्हाला वेळ द्या. आज आम्हाला वेळं दिली होती.

त्यानुसार सदाभाऊ खोत, आमदार मंगेश चव्हाण, महिला-पुरुष कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. फडणवीस यांना एसटी कामगारांच्या सगळ्या प्रश्नांची जाणीव आहे. आम्ही विनंती केल्यामुळे फडणवीस यांनी अनिल परब यांच्याशी चर्चा केली. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, ही भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडली आहे.’