महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्याला संरक्षण हीच उद्धव ठाकरे सेनेची संस्कृती ?-भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांचा परखड सवाल
विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याबद्दल उद्धव ठाकरे सेनेचे सोलापूर येथील नेते माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या विरुद्ध पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा च्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी शुक्रवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नेत्याला संरक्षण देणे हीच उद्धव ठाकरे सेनेची संस्कृती आहे का असा सवाल त्यांनी केला.यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन व पीडित महिलाही उपस्थित होती.
ढोले यांनी सांगितले की, माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे सेनेचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख असलेल्या खंदारे ह्यांनी आपले राजकीय वजन वापरून बेताची परिस्थिती असलेल्या एका महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवत लैंगिक शोषण केले.या महिलेने महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत न्यायासाठी दाद मागितली. मात्र तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे सेनेचे धोरण महिलांचे शोषण करण्याचेच होते, हेच यातून दिसले.आता पीडित महिलेला न्याय मिळायलाच हवा अशी ठाम भूमिकाही श्रीमती ढोले यांनी मांडली.पदाच्या बळावर गरीब महिलांना खोटी आमिषे,वचने देऊन वापरून नंतर त्यांना अडगळीत टाकायची हीच शिवसेनेची संस्कृती आहे,अशी घणाघाती टीकाही ढोले यांनी यावेळी केली .
श्रीमती ढोले म्हणाल्या की, एका लोकप्रतिनिधीकडून समाजाचे संरक्षण केले जाईल , महिलांचा सन्मान राखला जाईल अशा माफक अपेक्षा असतात. मात्र खंदारे यांच्या सारखा नेता हा राजकारणाला लागलेला कलंक आहे. माजी सामाजिक न्याय मंत्री असणा-या खंदारे यांनी गरीब महिलेला फसवून लैंगिक शोषण केले असून त्याच्या विरोधात भाजपा च्या प्रयत्नाने पीडित महिलेच्या कायदेशीर लढ्याला खरी सुरुवात झाली आहे.
खंदारे यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल झाला आहे. पदावर असताना जे बोलता ते निदान कृतीत तरी आणा असा खोचक सल्ला श्रीमती ढोले यांनी दिला . जिजाऊ ,सावित्रीबाई यांच्या महाराष्ट्रात एक माजी मंत्री २०१२ सालापासून असे घृणास्पद कृत्य करत होता. त्याची साधी दखल ही घेतली गेली नाही हे लांच्छनास्पद आहे असे ही त्या म्हणाल्या. पीडित महिलेला लग्नाचे आणि मुलाचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून शासकीय विश्रामगृहात बोलावून बलात्कार केला. पट्ट्याने मारुन, पळून जाऊ नये म्हणून चाकूचा धाक दाखवला. २०१५ मध्ये महिलेला मुलगा झाला. मुलाला सांभाळण्यासाठी खंदारेने दिलेले चेक सुद्धा बाउन्स झाले . विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधीच्या ३ बायका असल्याचा खुलासा देखील श्रीमती ढोले यांनी केला .
आज शिंदे-भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र बदलतोय आणि या महिलेला नक्कीच न्याय दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.