अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना बगल दिली जात आहे, अजित पवारांची सभागृहात माहिती

10
विधिमंडळ सभागृहाचं कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालतं. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना बगल दिली जात असल्याची गंभीर बाब विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’द्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
विविध आयुधांचा वापर करुन सदस्यांनी सादर केलेल्या सूचना मान्य किंवा अमान्य याची माहिती सदस्यांना मिळत नाही, कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना दिली जात नाही तसंच ही यादी कार्यवाहीसाठी मंत्रालयीन विभागांना पाठवली की नाही याची माहिती देण्यात यावी. ‘ऑर्डर ऑफ डे’ रात्री बारा वाजेनंतर संकेतस्थळावर देण्यात येत असल्याने दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाची माहिती सदस्यांसह मंत्र्यांना मिळत नाही.यात तत्काळ सुधारणेसह सभागृहाच्या नियम,प्रथा-परंपरांच योग्यप्रकारे पालन करण्याची मागणी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’द्वारे अजित पवारांनी सभागृहात केली.
विधिमंडळ सदस्य अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तारांकित प्रश्न, कपात सूचना इत्यादी आयुधांच्या सूचना आपल्या मान्यतेसाठी दाखल करीत असतात. विधिमंडळ सचिवांनी या सूचना मान्यतेसाठी आपल्याला सादर केल्यानंतर सूचना मान्य झाली किंवा अमान्य झाली, हे कळण्याचा सदस्यांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु गेल्या काही काळापासून ही परंपरा पाळली जात नाही. विधानसभा सदस्यांनी दाखल केलेला तारांकित प्रश्न स्वीकृत झाला किंवा अस्वीकृत झाला याबाबतचे ज्ञापन संबंधित सदस्यांना सचिवालयाकडून देण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. तसंच संबंधित विभागांच्या मागण्या मतदानासाठी ज्या दिवशी कामकाज पत्रिकेत दाखवलेल्या असतात, त्याचदिवशी अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना टपालाद्वारे प्राप्त व्हायची. परंतु आता हे बंद करण्यात आले आहे, आदी गोष्टी अजित पवारांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.