वारुळवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथे ४७ कोटी खर्च करून साकारण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जलपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १७ वाड्यांचा समावेश करण्यात आला असून येत्या ३० वर्षातील या भागातील पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे या योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्राकांत पाटील म्हणाले कि , ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे आजार होतात. याचा विचार करता ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याकरीता ७० हजार कोटीची ‘हर घर जल’ योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळजोडणी देण्यात येणार आहे. वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी ४७ कोटी ४८ लक्ष ८७ हजार ७२६ रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये सन २०५४ पर्यंत लोकसंख्येचा विचार करुन प्रत्येक नागरिकाला ५५ लिटर दर दिवशी शुद्ध पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात आले. यामध्ये जुन्या पाईपसोबत नवीन पाईप लाईनचे काम करण्यात येणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रविंद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच ज्योती संते आदी उपस्थित होते.