एसटी कर्मचारी संपावर ठाम: नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांचे मुंडण आंदोलन

नाशिक: ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसटी महामंडळ  बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशान्वये राज्य सरकारने समिती नेमली आहे. तरी देखील ठोस तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.

नाशिकमध्ये राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांचा संप संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. आज सकाळी मुंडण आंदोलन करत आंदोलक मागण्यांवर ठाम असल्याचे दिसून आले. आज तिसऱ्या दिवशी देखील नाशिक जिल्ह्यातील एकाही डेपोमधून बस बाहेर पडली नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील सर्वच आगारांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी पुकारलेला संप हा मंगळवारी तिसऱ्या दिवशीही कायम आहे. बंद पुकारला गेल्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या असून खिशाला मोठी कात्री लागत आहे. एन.डी. पटेल रोड येथील परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या प्रवेश द्वारा बाहेर विविध संघटनाकडून धरणे आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी देखील आपले समर्थन दिले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये संप पुकारल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.