नागरिकांशी थेट भेट व संवाद या उपक्रमाची चंद्रकांत पाटील यांनी आजपासून केली सुरुवात

पुणे  : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज महात्मा सोसायटी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी थेट भेट व संवाद या उपक्रमाची आजपासून सुरुवात केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आज नागरिकांसोबत साधलेल्या संवादात प्रामुख्याने पाण्याच्या प्रश्नासह महात्मा सोसायटीत बसविण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर संदर्भात अनेकांनी तक्रारी मांडल्या. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने महापालिका आणि जलसंपदा विभाग पाण्याचे नियोजन करत आहे. सध्या महापालिकेला शहरात कुठेही पाणीकपात करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. पण तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

तसेच महात्मा सोसायटीतून जाणारा रस्ता हा खासगी असूनही, पुणे-बेंगलोर महामार्गाकडे जाण्यासाठी अनेकजण याच मार्गाचा वापर करतात. या रस्त्याला पर्यायी असणारा एकलव्य कॉलेजजवळून जाणारा मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असून, लवकरच तो तयार होईल, त्यासाठी माझ्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देऊ. यामुळे वाहतुकीचाही प्रश्न सुटेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.