खादी म्हणजे केवळ कापड नसून पर्यावरणाचा संतुलनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे साधन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शिवाजीनगर येथील हातकागद संस्था येथे आयोजित मातीकला वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  ग्राम विकासाला प्रोत्साहन व चालना देण्याची गरज असून प्रदर्शन व विक्री केंद्र आदी उपक्रमामुळे ग्रामीण कामगारांची प्रगती होण्यास मदत होईल, असे विचार यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, खादी ग्रामोद्योगाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची गरज आहे. खादी म्हणजे केवळ कापड नसून पर्यावरणाचा संतुलनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे साधन आहे. ग्रामीण भागातील कारागिरांना स्वतः पायावर उभे करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता शहरी भागातील पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महामंडळाच्यावतीने आयोजित निंबध स्पर्धेत सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे ‘ग्रामोद्योग’ या त्रैमासिक अनावरण करण्यात आले. हे प्रदर्शन ३ मे पर्यंत सकाळी १० ते सायं. ८ या वेळेत खुले असणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत, खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरे, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उद्योजक श्रीकांत बडवे आदी उपस्थित होते.