‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८ हजार कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित, चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
पुणे : भारत हा शेती प्रधान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजाला पाठबळ देण्यासाठी सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यात येणार असून याच योजने अंतर्गत काल देशातील ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रुपये १८ हजार कोटींहून अधिकची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
मोदी सरकारच्या या कृतीचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत असताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पाटील म्हणाले बळीराजाची काळजी वाहणाऱ्या मोदी सरकारचे लाख लाख धन्यवाद! ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत, देशातील ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रुपये १८ हजार कोटींहून अधिकची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. यासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण सुनिश्चित करत असून या योजनेमुळे बळीराजाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल असा विश्वास वाटतो.