रिध्दपूर येथे येत्या जूनपासून सुरु होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मराठी भाषा विद्यापीठ सुरु व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमुल्य आहे. त्यांच्या अमुल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिध्दपूर ठरली आहे. यामुळे रिध्दपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. ‘लीळाचरित्रा’सारखा आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील, याचाही विचार करण्यात आला असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी श्री गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरातील आद्य मराठी गद्य ग्रंथ लिळाचरित्राचे निर्मिती स्थान, वाजेश्वरी येथील दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंदप्रभू यांचे दर्शन घेतले. तसेच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली. येथील हस्तलिखित पोथ्या सातशे वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील सहाशे वर्षापूर्वींच्या संत महात्म्यांच्या वापरातील कापडी भांडी, गाठी यांचीही पाहणी करुन येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा, गोविंद्रप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रम शाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.