सरकार म्हणून राजाश्रय नक्कीच देऊ; पण त्यासोबतच नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी लोकाश्रय देखील मिळाला पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

6
सोलापूर : सोलापुरात आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाचा समारोप आणि बीड मध्ये होणाऱ्या संमेलनासाठी रंगभूमीचं प्रतिक असलेली घंटा हस्तांतरण सोहळा रविवारी नॉर्थकोट मैदान येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आगामी संमेलन बीडमध्ये होत असल्याने बीडच्या संयोजकांना पाटील यांनी भव्यदिव्य संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, सोलापूरच्या नाट्यसंमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारताना अतिशय आनंद झाला. वास्तविक मी स्वतः नाट्य क्षेत्राशी जोडलेलो असल्याने नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली. या संमेलनासाठी सर्वांनी मन लावून काम केलं. त्याबद्दल पाटील यांनी सर्वांचेच मनापासून अभिनंदन आणि आभार मानले. खरंतर नाटकासाठी राजाश्रयासोबत लोकाश्रय देखील गरजेचा आहे. कोविड काळात नाट्यक्षेत्राशी जोडलेल्या अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सरकार म्हणून राजाश्रय नक्कीच देऊ; पण त्यासोबतच नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी लोकाश्रय देखील मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभे राहावे, ज्यायोगे नाटकांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येईल, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

पाटील पुढे म्हणाले, मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशातील रंगभूमी टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्याने ती टिकविणं, जगविणं आपली जबाबदारी आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात नाटकाचा भाव पोहोचून रसिकांनी तिकीट काढून नाटक पाहावे आणि महाराष्ट्रात या माध्यमातून नाट्य रसिकांची संख्याही वाढावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठातून युवा कलावंत निर्माण व्हावेत यासाठी शासनाकडून विद्यापीठाच्या कला विभागास अनुदान देण्यात येते. कला विभागाला ज्यादा चा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

सोलापूर येथे 100 व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन पार पडण्यासाठी यशस्वीरित्या काम केल्याने  पाटील यांनी कौतुक करून स्वतःच्या हातातील घड्याळ विजयदादा साळुंके यांना भेट दिले. यावेळी  साळुंखे रंगमंचावरच भावूक झाले.

यावेळी शोभा बोल्ली यांच्या नटरंग या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सोलापूर येथील सर्व रंगकर्मी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यानंतरचे नाट्यसंमेलन बीड येथे होणार असल्याने नटराजची मूर्ती आणि नाटकाची घंटा बीड शाखेकडे  सुपूर्त  करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे  कोषाध्यक्ष सतीश लोटके, सिने कलाकार किशोर महाबोले, नीलम शिर्के सामंत, दीपक करंजीकर,अशोक हांडे, अतुल परचुरे, सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा,प्रा. शिवाजी सावंत, कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजयदादा साळुंके, कार्याध्यक्ष अविनाश महागावकर, समन्वयक मोहन डांगरे, स्वागत सचिव प्रशांत बडवे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.