माला आणि नीला पाथरे यांच्या सुरेल सतार मैफिलीने सांगलीकर मंत्रमुग्ध; दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांना नेहमीच सहकार्य करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगलीतील कलारसिकांसाठी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सांगीतिक मैफिलीला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमातील दुसरे पुष्प म्हणून प्रसिद्ध भगिनी माला पाथरे आणि नीला पाथरे यांच्या सुरेल सतार मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सुंदर सांगीतिक कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून कलाकारांचे कौतुक केले.

या मैफिलीदरम्यान माला आणि नीला पाथरे यांनी आपल्या अप्रतिम सतारवादनातून एकापेक्षा एक सुंदर रचना सादर केल्या. त्यांच्या बहारदार वादनाने उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांचे मनापासून अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगलीच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, “सांगलीला मोठी सांस्कृतिक आणि सांगीतिक परंपरा लाभली आहे. सांगलीत अशा प्रकारचे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने आयोजित होणे गरजेचे असून, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या वतीने आणि वैयक्तिक पातळीवर नेहमीच केले जाईल.
“या दिमाखदार सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या ‘सई क्रिएशन’च्या संयोजिका रेखा पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सांगलीतील शेकडो कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.