सांगली येथील दैनिक लोकमतच्या ‘एक्सलन्स अवॉर्ड’ सोहळ्यात गुणवंतांचा गौरव; प्रत्येकाने “देशासाठी जगलं पाहिजे” – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : समाजाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सांगली येथे आयोजित दैनिक लोकमतच्या ‘एक्सलन्स अवॉर्ड’ सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमत समूहाच्या या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले. ते म्हणाले, स्वतःचे कर्तृत्व, समर्पण आणि नम्रतेच्या बळावर समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हा लोकमतचा उपक्रम निश्चितच अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. समाजातील चांगल्या कार्याची वेळेत दखल घेऊन त्याला असे प्रोत्साहन देण्याची ही सकारात्मक परंपरा समाजाला नेहमीच एक नवी आणि योग्य दिशा देणारी ठरते.
पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रनिर्माणाचा मोलाचा संदेश दिला. स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी थोर क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले. आता स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचा हा आपला प्रवास आहे. या प्रवासात देशातील प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन नेहमी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आपण सर्वांनी “देशासाठी जगलं पाहिजे” ही राष्ट्रीय भावना सदैव मनात ठेवून आपले कार्य केले पाहिजे.
या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, सहाय्यक कामगार आयुक्त श्री. एम. ए. कादर, चितळे ग्रुपचे गिरीश चितळे, विभाग संपादक सचिन नवलकोटे, सांगली आवृत्ती संपादक अविनाश कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.