पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा; पाणी बचतीची सवय अंगीकार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

5

सांगली : पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे, तो जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळात पाण्याचे संकट अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरांमध्येही जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन आणि पाणी बचतीसाठी व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभाग, सांगली यांच्या वतीने आयोजित ‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ उपक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता तथा उपअभियंता अमित पाटील, उप कार्यकारी अभियंता सुनील खैरमोडे, उपअभियंता राजश्री काटकर, ज्योती भिसे व विक्रम देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी पाणी व माती संवर्धनाची शपथ घेतली. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनचा शुभारंभ केला. सांगलीतील वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेट (१०० फूट रोड) ते बापट मळा आणि पुन्हा वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेट असा महावॉकेथॉनचा मार्ग होता.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा’ या संकल्पनेवर आधारित व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून सांगलीत ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला एवढ्या सकाळी नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे. निसर्गातील बदलांसाठी केवळ निसर्गाला दोष देता येणार नाही. मानवाने पर्यावरणाचे संतुलन बिघडविले आहे. मोठमोठ्या इमारती, रस्ते आणि वाढते नागरीकरण यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

‘जलयुक्त शिवार’मुळे जलसंधारणाला गती

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात आले. पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरावे आणि भूजलसाठा वाढावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर पुन्हा सन 2022 मध्ये ‘जलयुक्त शिवार अभियान-२’ सुरू करण्यात आले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली असून भूजलसाठा वाढविण्यासाठी या कामांचा मोठा उपयोग होत आहे, असे त्यांनी सांगितले.

शहरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आवश्यक

पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण भागाबरोबरच शहरांमध्येही पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये छतावर पडणारे पावसाचे पाणी पाइपलाइनद्वारे त्याच परिसरातील बोअरमध्ये सोडून भूजलसाठा वाढविता येतो. रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग आता केवळ प्रयोग राहिलेला नसून तो प्रभावीपणे सिद्ध झाला आहे. त्यामुळे शहरांमध्ये त्याची व्यापक अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसभरात आपण पाणी कोणकोणत्या कारणांसाठी वापरतो आणि त्यातील कुठे पाण्याची बचत करता येईल, याचा प्रत्येकाने विचार करावा. उपलब्ध पाण्याच्या साठ्याचे योग्य नियोजन आणि काटकसरीचा वापर केल्यास भविष्यातील पाणीटंचाईचे संकट कमी करता येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

रील स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ या विशेष इन्स्टाग्राम स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. महावॉकेथॉनच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांना मिळालेल्या प्रतिसादाचे त्यांनी कौतुक केले.
या उपक्रमासाठी ४ हजार १६२ नागरिकांनी नोंदणी केली होती. नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेत जलसंधारणाचा संदेश दिला.

यावेळी महावॉकेथॉनमध्ये प्रथम दहा क्रमांकांमध्ये आलेल्या सहभागींचा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, सांगली पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महादेव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.