जत उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आधुनिक आरोग्य सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : जतच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था उपलब्ध झाली आहे. जत परिसरासह कर्नाटक राज्यातील तसेच जत पूर्व ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना याचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जत येथील उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, सभापती अर्चना पाटील, तहसीलदार प्रवीण धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, डॉ. भारती पाटील आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गर्भवती महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहिल्यास सुदृढ भावी पिढी निर्माण होईल. त्यासाठी पोषक आहार व सुरक्षित प्रसूती यांचे मोठे महत्व आहे. वेळेवर आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी पुण्यामध्ये त्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या सुखदा उपक्रमाची माहिती दिली.
पाटील म्हणाले, या उपजिल्हा रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक व दुय्यम स्तरावरील उपचारासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होऊन, वेळेत व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. येथे माता व बाल आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार, सर्वसाधारण वैद्यकीय सेवा तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. येथे एक्स-रे सुविधा व डायलेसिस सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जतसाठी मंजूर कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी तज्ञ डॉक्टर व स्टाफ, वाहनचालक यांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच डायलिसिस सेंटर सुरु करण्यासाठी आवश्यक शासकीय उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोगतात उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक सोयीसुविधा तसेच अधिकच्या आरोग्य सुविधांची मागणी केली.
प्रास्ताविकात डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये 7 वैद्यकीय अधिकारी व इतर तांत्रिक कर्मचारी यांची अतिरिक्त पदे व आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा होणार आहे.
प्रारंभी पालकमंत्री यांच्या हस्ते फ़ीत कापून व कोनशिला अनावरण करून रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले.
जत येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवाढ होऊन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे. या इमारतीत 3 मजले आहेत. या इमारतीचे अंदाजे क्षेत्रफळ ३३३२.२९ चौरस मीटर इतके असून या इमारतीवर रु. ९३०४.०० लक्ष इतका खर्च करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, आरोग्यसेवक, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.