संभाव्य टंचाई स्थितीचा विचार करून यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

4

सांगली : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण पाहता आगामी संभाव्य टंचाई स्थितीचा विचार करून यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे. आवश्यकतेनुसार उपलब्ध पाणीसाठा, टँकर्स व चारा डेपो या दृष्टीने वेळोवेळी आढावा घ्यावा, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून आगामी पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

सांगली जिल्ह्यातील टंचाई स्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महादेव गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब आजगेकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून पाटबंधारे, कृषी, पशुसंवर्धन व संबंधित सर्व विभागांनी दक्ष राहावे. पूर्व भागातील जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ या पूर्णतः अवर्षणप्रवण तालुक्यातील स्थितीचा जिल्हाधिकारी यांनी नियमित आढावा घ्यावा. वेळोवेळी आवश्यकतेनुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात. उपलब्ध जलस्रोत व साठवण तलाव, जलस्रोतांचे अधिग्रहण आदिंबाबत सूक्ष्म नियोजन करावे, असे सांगून त्यांनी परतीचा पाऊस चांगला होईल, अशी आशा व्यक्त केली.

यावेळी पाटील यांनी जिल्ह्यातील मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा, उपसा सिंचन योजनांमधून तालुकानिहाय दिलेले पाणी, टंचाईअंतर्गत देण्यात आलेल्या पाण्याचा तपशील, टँकर्सची आवश्यकता, पाणीपुरवठ्याचे नियोजन, चारा डेपो, खरीप व रब्बी हंगामाचे नियोजन आदिंच्या अनुषंगाने आढावा घेतला.

यावेळी अधीक्षक अभियंता महादेव कदम यांनी सांगली जिल्ह्यातील पाणीसाठ्याबाबतची सद्यस्थिती सादर केली. जिल्ह्यातील एकूण 83 प्रकल्पांमध्ये आजस्थितीला 34 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. चालू सिंचन वर्षात ताकारी उपसा सिंचन योजनेचे एक आवर्तन पूर्ण झाले असून, 6 सप्टेंबरपासून दुसरे आवर्तन सुरू आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत 7 जुलैपासून तर टेंभू योजनेतून 8 जुलैपासून आवर्तन सुरू आहे. तिन्ही उपसा सिंचन योजनांतून आतापर्यंत 6657 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जत तालुक्यातील दोड्डानाला प्रकल्पात पाणी भरण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.