काणेबुवा प्रतिष्ठानच्या ‘गुरुकुल संगीत विद्यालयाला’ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट; संत तुकारामांच्या अभंगाने मन भारावले!
सांगली : सांगली येथील संगीत क्षेत्रातील नामांकित संस्था ‘संगीताचार्य द.वि. काणेबुवा प्रतिष्ठान’ संचालित ‘गुरुकुल संगीत विद्यालयाला’ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली सदिच्छा भेट अत्यंत आनंददायी आणि आत्मिक समाधान देणारी ठरली. भारतीय शास्त्रीय संगीताची ही समृद्ध आणि अलौकिक परंपरा नव्या पिढ्यांपर्यंत अशीच अखंडपणे पोहोचत राहो, अशी मनापासून सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान गुरुकुल संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी शांभवी देशपांडे हिने आपल्या सुमधुर स्वरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ‘आपोआप भेटे देव, गुरुचरणी ठेविता भाव’ हा सुंदर अभंग सादर केला. शांभवीच्या या सुश्राव्य गायनाने उपस्थित सर्व रसिक भारावून गेले. या सादरीकरणाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मनही अतिशय प्रसन्न झाले.
या प्रसंगाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “विद्यालयातील वातावरण आणि मुलांचे सादरीकरण अप्रतिम आहे. संगीत, साधना आणि संस्कार यांचा इतका सुंदर आणि पवित्र संगम प्रत्यक्ष अनुभवण्याचा हा प्रसंग माझ्यासाठी खरोखरच अत्यंत विशेष आणि मनाला स्पर्श करून जाणारा होता, असे पाटील यांनी म्हटले.
या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, चितळे समूहाचे गिरीश चितळे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भक्ती चितळे प्रतिष्ठानच्या संचालिका विदुषी मंजुषा पाटील तसेच गुरुकुलचे श्रद्धेय साधक आणि असंख्य संगीतप्रेमी उपस्थित होते.