पिंपरी चिंचवड भाजपा कार्यालयाची आचारसंहिता संपणार तरी कधी ?
एकीकडे आनंदोत्सव साजरा करणारे उत्साही पदाधिकारी आणि दुसरीकडे मरगळ आलेली कार्यालयीन यंत्रणा
पिंपरी : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन झाले, नुकतेच खाते वाटपही पार पडले. अनेक ठिकाणी या शपथविधी सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुठे पेढे वाटले गेले तर कुठे फटाके वाजविले गेले. संपूर्ण देशभरात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा हा दिवस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्साहात साजरा केला. पिंपरी चिंचवड शहरात भाजपाकडून अनेक ठिकाणी शपथ विधी सोहळा थेट प्रक्षेपण कार्यक्रम नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते.
मात्र विजयानंतर शपथ विधीझाल्यावरही भाजप पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात मात्र शांतता होती, कोणतेही सेलिब्रेशन नव्हते. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक आचारसंहितेवेळी झाकण्यात आलेला भाजप कार्यालयाचा फलक देखील अजूनही आचारसंहिता संपल्यानंतरही त्याच अवस्थेत आहे. त्यामुळे नक्की कोणती आचारसंहिता पाळण्यात येत आहे हा प्रश्न पडतो. कार्यालयात रोज हजेरी लावणारे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी आहेत तरी सुद्धा अत्यंत सामान्य बाब देखील त्यांच्या कडून दुर्लक्षित होते हे नवलंच आहे. एकीकडे आनंदोत्सव साजरा करणारे उत्साही पदाधिकारी आणि दुसरीकडे मरगळ आलेली कार्यालयीन यंत्रणा पाहता, या पक्षाच्या कार्यालयातच उत्साहाचा, अनुशासनाचा आभाव तर नाही ना ? कदाचित ४०० पारचा नारा फसल्यानेच तो उत्साह मावळला तर नाही ? पिंपरी चिंचवड भाजपा कार्यालयाची आचारसंहिता संपणार तरी कधी ? असा प्रश्न यावेळी पडतो.
शहरात अनेक राजकीय पक्षांची लहान मोठी कार्यालये आहेत, सर्व महत्वाच्या बैठका, प्रमुख नेत्यांच्या भेटी येथे सातत्याने होत असतात. शहराचे मध्यवर्ती कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी केंद्र स्थान आणि प्रेरणा असते तेथे अशा प्रकारचा हलगर्जीपणा होणे हे जगातील सर्वात मोठ्या आणि सुसंघटित व्यवस्थापन असलेल्या पक्षाला किती शोभते याचे चिंतन त्यांनीच केले पाहिजे.
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. राज्यात शिक्षक आणि पदवीधरच्या चार जागांसाठी निवडणूक सुरू असून हा भाग वगळता इतर ठिकाणी आचारसंहिता संपुष्टात आल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.