पुणे : सुमारे पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आधुनिक सोईसुविधांनी युक्त पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल अखेर पुणेकरांसाठी खुलं झालं आहे. पुण्याच्या विकासाची साक्ष असलेल्या नव्या टर्मिनल बद्दल समस्त पुणेकरांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खूप खूप अभिनंदन केले.
पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे चार महिन्यांपूर्वी उदघाटन झाले होते. या उद्घाटनानंतर आता अखेरीस त्यावरून प्रत्यक्ष सेवा सुरु झाली आहे. या टर्मिनलवरून पहिल्या विमानाचे उड्डाण रविवारी झाले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते टर्मिनलवरून पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास देऊन या टर्मिनलची सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेबाबत चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले आहे. पाटील यांनी म्हटले कि, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपत पुणेरी परंपरेची ओळख करून देणारं हे नवं टर्मिनल प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटावा असं साकारलं गेलंय. पुण्याच्या विकासाची साक्ष असलेल्या नव्या टर्मिनल बद्दल समस्त पुणेकरांचे खूप खूप अभिनंदन, असे पाटील म्हणाले.
एअर इंडियाचे पुणे ते दिल्ली आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे पुणे ते भुवनेश्वर या विमानांचे उड्डाण सर्वप्रथम नवीन टर्मिनलवरून झाले. सोमवारपासून १६ विमानांचे उड्डाण होणार असून, १६ विमाने उतरणार आहेत. टप्प्याटप्प्याने विमानांची संख्या वाढविली जाणार आहे.