पुण्यात गायक आनंद शिंदे यांच्या बुद्ध-धम्म गीतांचा सुरेल कार्यक्रम; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली महामानवांना मानवंदना
पुणे : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पुण्यात एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक शैलजीत बनसोडे यांच्या संयोजनातून आयोजित प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या बुद्ध-धम्म गीतांच्या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या महामानवांचे विचार आजही समाजाला नवी दिशा देणारे आहेत. त्यांचे कार्य आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी आपल्या खड्या आवाजात सादर केलेल्या बुद्ध-धम्म गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या गीतांमधून दिलेला समाजप्रबोधनाचा संदेश अत्यंत प्रेरणादायी असल्याचे पाटील यांनी नमूद केले. या संगीतमय सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्यमय आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमानुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.