कोथरूडच्या रंगभूमीला मिळणार नवे अधिष्ठान; ८ मे रोजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’चा दिमाखदार शुभारंभ

4

पुणे : विद्येचे माहेरघर आणि पुण्याचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या कोथरूडमधील रंगभूमीला आता नवे अधिष्ठान मिळणार आहे. भागातील नवोदित आणि हौशी कलाकारांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे आणि नाटकाची संस्कृती नव्या पिढीमध्ये रुजावी, या उद्देशाने ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. या संस्थेचा भव्य शुभारंभ येत्या शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोथरूडमध्ये कला आणि संस्कृतीचा मोठा वारसा आहे. हा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. येथे कलाकारांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे भविष्यात कोथरूडमधून कसदार कलाकार घडण्यास मदत होईल , असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

या उपक्रमाबद्दल बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाटकाची संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. ही संस्कृती पुढच्या पिढीत अधिक जोपासली जावी आणि आपल्या भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी या फाऊंडेशनची स्थापना केली जात आहे. हा क्षण कोथरूडच्या सांस्कृतिक इतिहासात मैलाचा दगड ठरेल.

हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ८ मे २०२६ रोजी, एम.ई.एस. (MES) ऑडिटोरियम, कोथरूड, येथे सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत संपन्न होणार आहे. कोथरूडच्या सांस्कृतिक वारशाला अधिक समृद्ध करणाऱ्या या सोहळ्यासाठी नागरिकांनी आणि रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.