आयटी क्षेत्रातील दिग्गज रवी पंडित यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे : पुण्यातील आयटी क्षेत्राचे आधारस्तंभ आणि ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज’चे (KPIT Technologies) अध्यक्ष रवी पंडित यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रवी पंडित यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने ‘केपीआयटी’ला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत मानाचे स्थान मिळवणारे पंडित हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर त्यांनी अनेक तरुण स्टार्टअप उद्योजकांना दिशा दाखवली. त्यांच्या निधनाने पुणे शहर आणि देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
श्रद्धांजली वाहताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत मानाचे स्थान मिळवणारे रवी पंडित हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर अनेक तरुणांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनाने पुणे आणि देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. पुण्यातील उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनीही रवी पंडित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.