महायुती सरकार मजबूत पायाभूत सुविधा उभारून केवळ पायभूत सुविधाच नाही तर सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना देत आहे – चंद्रकांत पाटील
पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नव्या पादचारी पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून यामुळे चांदणी चौक येथून मुंबईला जाणे अधिक सोपे होणार आहे. सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चुन ११० मीटर लांबीचा व ६.६ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पाषाण ते मुंबईच्या दिशेने असलेला बसथांबा या दरम्यान हा नवा पादचारी पूल उभारण्यात येणार असून, या महिन्याच्या अखेरीस पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात महायुती सरकार मजबूत पायाभूत सुविधा उभारून केवळ पायभूत सुविधाच नाही तर सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना देत आहे. या कामगिरीबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद!, असे पाटील यांनी म्हटले आहे.
पादचाऱ्यांना मुंबईला जाणारी बस पकडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडून बस थांब्याजवळ यावे लागत होते. यात अपघाताचा मोठा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पादचारी पुलाचा प्रस्ताव सहा ते सात महिन्यांपूर्वी मुख्यालयाकडे पाठवला होता. त्याला आता मंजुरी मिळाली असून त्याच्या निविदेची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्टअखेरीस पुलाच्या कामाला सुरुवात होईल. यामुळे पादचाऱ्यांना बसथांब्याकडे जाताना रस्ता ओलांडून जाण्याची गरज नाही. ते पुलावरून सुरक्षित पणे जाऊ शकतील