रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत शासनाकडून निधी उपलब्ध करुन देणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

34

अमरावती : अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिध्दपूर येथे उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे दुरदृष्य प्रणालीद्वारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण रविवारी लोकार्पण करण्यात आले. महानुभाव पंथाची काशी म्हणून रिध्दपूर सर्वदूर प्रसिध्द आहे. तसेच जगातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ या ठिकाणी स्थापित होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस चौकी स्थापित होवून त्याचे लोकार्पण आज होत आहे, ही अतिशय आनंदाची व अभिनंदनाची बाब आहे. रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत सीएसआर फंड व अन्य योजनांतून शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या रिध्दपूर हे मराठी वाड्मयाची सुध्दा काशी आहे. या पावन भूमीत मराठीतील लिळाचरित्र आद्यग्रंथ लिहीला गेला आहे. मराठी भाषेचा उगम याठिकाणी झाला असून जगातील पहिले मराठी भाषेचे विद्यापीठ येथे निर्माण होत आहे. जगभरातील संशोधक व अनुयायी मराठी भाषेच्या संशोधनासाठी याठिकाणी भेट देतील. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस चौकी स्थापन करणे हा शासनाचा मानस होता. त्यानुसार आज याठिकाणी भाड्याच्या ईमारतीत पोलीस चौकी स्थापित होऊन त्याचे लोकार्पण आज होत आहे, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले की, यापुढेही रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी शासनाकडून निधी पुरविण्यात येईल. अद्ययावत पोलीस स्टेशन हे लोकांच्या संरक्षण व सुविधेची हमी असते. त्यानुषंगाने पोलीस चौकीच्या निर्मितीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने येथील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे. रिध्दपूर येथे आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनास सादर करावा, त्यानुषंगाने निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अन्य विभागप्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.