शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न

21

मुंबई : शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय तंत्रनिकेतन मधून प्राप्त होणाऱ्‍या कौशल्याची उपयुक्तता आणि महत्त्व विशेष उपक्रमाद्वारे उच्च शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवले आहे, असे पाटील यावेळी म्हणाले.

पाटील म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतन मधील पदविकाधारक विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच बाहेरही मागणी वाढत असून रोजगाराच्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन मधून प्राप्त होणाऱ्‍या कौशल्याची उपयुक्तता आणि महत्त्व विशेष उपक्रमाद्वारे उच्च शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतन इमारतीचे बांधकाम हे दर्जेदार करण्याची खबरदारी सर्व संबंधितांनी घ्यावी, सुविधायुक्त तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या व्यापक उद्देशाने सर्वांनी कार्यवाही करावी, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांच्या निविदा प्रक्रिया येत्या महिनाअखेर पूर्ण कराव्यात तसेच विहित कालमर्यादेत या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. यावेळी अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, रत्नागिरी, कोकण, ठाणे, विक्रमगड, पेण या ठिकाणच्या मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकाम प्रस्तावांच्या संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेऊन मंत्री चव्हाण यांनी या महिनाखेर सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याबाबत पुढील कार्यवाही तत्परतेने करुन शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचित केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर आदींसह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.