सरकार, पोलीस प्रशासन आणि जनता यांच्या ऐक्याच्या बळावर अमली पदार्थ नावाच्या असुराचा नाश होईल, हा माझा ठाम विश्वास – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : 26 जानेवारीच्या ध्वजवंदन प्रसंगी जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तसेच अमली पदार्थांची माहिती देणाऱ्यास माझ्या मानधनातून 10 हजाराचे बक्षीस देण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात सांगली पोलिसांनी तब्बल 30 कोटींचे मेफाड्राईन जप्त करुन तिघांना ताब्यात घेतले आहे. अमली पदार्थविरोधी या मोहिमेत पालकमंत्री म्हणून मी जिल्हा पोलीस दलाच्या पाठीशी ठाम उभा आहे. सरकार, पोलीस प्रशासन आणि जनता यांच्या ऐक्याच्या बळावर अमली पदार्थ नावाच्या असुराचा नाश होईल, हा माझा ठाम विश्वास आहे, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, अमली पदार्थांचे सेवन ही मोठी समस्या आहे. देशाच्या तरुणाईला अमली पदार्थांचा मोठा धोका आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने अमली पदार्थांच्या संदर्भात “झिरो टॉलरन्स” धोरण ठेवले आहे. आपला सांगली जिल्हा अमली पदार्थमुक्त व्हावा, लोकसहभागातून एक चळवळ उभी राहावी, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच, 26 जानेवारीच्या ध्वजवंदन प्रसंगी जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याचे आवाहन केले होते. तसेच अमली पदार्थांची माहिती देणाऱ्यास माझ्या मानधनातून 10 हजाराचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. अवघ्या दोनच दिवसात सांगली पोलिसांनी तब्बल 30 कोटींचे मेफाड्राईन जप्त करुन तिघांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईबद्दल कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधीक्षक तासगाव सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, धनंजय फडतरे आणि अन्य सांगली पोलिसांचे आणि या कारवाईला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या जनतेचे पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले.