तासगाव रिंग रोडचा मार्ग मोकळा; भूसंपादनाचे धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना वितरित
सांगली : तासगावच्या विकासाला नवी गती देणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘तासगाव रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित झालेल्या शेतकरी बांधवांना भूसंपादनाचे धनादेश वितरित करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे धनादेश वितरित केले गेले.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, तासगाव आणि परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची वाहतूक कोंडीची समस्या या प्रकल्पामुळे कायमस्वरूपी सुटणार आहे. राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भरीव निधी मंजूर केला असून, यामुळे भागाच्या सर्वांगीण विकासाला मोठे बळ मिळणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रिंग रोडचा प्रश्न मार्गी लागला. रिंग रोडमुळे तासगावच्या सभोवतालच्या परिसराचा आर्थिक आणि औद्योगिक विकास होईल. प्रवाशांचा वेळ वाचेल आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होईल. राज्य शासनाने या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठी भरीव निधी मंजूर केला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला वेग मिळणार आहे.
या कार्यक्रमाला माजी खासदार संजयकाका पाटील, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.