पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरीय जनगणना कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

10

सांगली : जनगणना 2027 च्या कामकाजाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कक्षामार्फत जनगणना 2027 चे काम सुरळीत, चोखपणे व कालमर्यादेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, तहसिलदार लीना खरात आदि उपस्थित होते.

भारतीय जनगणना 2027 ही पहिली डिजीटल जनगणना आहे. प्रधान जनगणना अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष असून जिल्हा जनगणना अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आहेत. दिनांक 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वयं जनगणना se.census.gov.in या वेबसाईटवर करावयाची आहे. दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरयादी व घरगणना एलएलओ मोबाईल ॲपव्दारे प्रगणक करणार असून यामध्ये 34 प्रश्न विचारले जाणार आहेत. दिनांक 1 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत प्रत्यक्ष लोकांची गणना म्हणजेच जनगणना होणार आहे.

जनगणनेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात ग्रामीण व शहरी असे एकूण 21 चार्ज अधिकारी आहेत. यामध्ये ग्रामीणसाठी एकूण 10 तहसिलदार हे चार्ज अधिकारी असून शहरीसाठी एकूण 11 मुख्याधिकारी हे चार्ज अधिकारी आहेत. एचएलबीएस (घर यादी गट) एकूण 3 हजार 916 आहेत. एक घर यादी गटात 700 ते 800 लोकसंख्येचा भाग असतो. जनगणनेसाठी एकूण 4 हजार 281 प्रगणक, 717 पर्यवेक्षक, 70 फील्ड ट्रेनर नियुक्त केले आहेत. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय जनगणना अधिकारी व कर्मचारी, फील्ड ट्रेनर यांचे प्रशिक्षण पार पडले असून, प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दिनांक 23 एप्रिल 2026 पासून चार्ज स्तरावर सुरू झाले असून ते 8 मे 2026 पर्यंत चालणार आहे.

तसेच, प्रत्यक्ष क्षेत्रकार्य सुरू होण्यापूर्वी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत se.census.gov.in या संकेतस्थळावर व्यक्ती स्वत: व आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकणार आहेत. नागरिकांनी se.census.gov.in या पोर्टलचा वापर करून आपली नोंदणी स्वतः करावी व जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.