“विकसित भारत २०४७” च्या राष्ट्रीय ध्येयाअंतर्गत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली, १ मे २६ : महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. कृषि, उद्योग आणि सेवा क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि गौरवशाली वारसा पुढे नेण्यात सांगली जिल्ह्याचे योगदान बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे सांगून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी “विकसित भारत २०४७” या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेसाठी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प असल्याची ग्वाही आज येथे दिली.
महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. पोलिस कवायत मैदान, विश्रामबाग येथे आयोजित या कार्यक्रमास महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, उपवनसंरक्षक सागर गवते, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा विकास आराखड्यासाठी २५२ कोटी रुपये राखीव
उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन चंद्रकांत पाटील म्हणाले, सन २०३० पर्यंत जिल्ह्याचा जीडीपी १ लाख ७७ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजनमधील २५ टक्के निधी या धोरणात्मक कामांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गत आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेचा ५४५ कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करण्यात आला असून, त्यापैकी १८५ कोटी रुपये जिल्हा धोरणात्मक आराखड्यातील कामांसाठी वापरण्यात आले. चालू वर्षातही ५८९ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून २५२ कोटी रुपये विकास आराखड्यावर खर्च करण्याचे नियोजन आहे. त्यातून जिल्ह्याचा संतुलित आणि चौफेर विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा नियोजनमधून सन २०२५-२६ करिता पोलीस विभागाकडील पायाभूत सुविधांसाठी १५ कोटी ५७ लाखांच्या प्रस्तावांची प्रशासकीय मान्यता होऊन कामे प्रगतीपथावर आहेत. सहा पोलीस वाहनांवर ९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून वॉच ठेवला जात आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात आतापर्यंत चार शिबिरांतून महसूल विभागाशी संबंधित विविध योजनांचा जिल्ह्यातील लाखभर लोकांना लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले.
“अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा”साठी त्रिसूत्री
“अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियान हाती घेत वर्षभरापासून कायद्याचा धाक, जनजागृती व उपचार ही त्रिसूत्री राबवण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सी एस आर निधीतून जिल्ह्यात संयम (सेल्फ अवेअरनेस इन युथ फॉर अँटी अडिक्शन मोटिव्ह) उपक्रमांतर्गत ३०० हायस्कूलमधील ६०० शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. त्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष्यमान भारत योजनेतून २७ हजार रूग्णांवर उपचार
पी. एम. स्वनिधी योजनेतून महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना तीन टप्प्यात २९ कोटी ७२ लाख रुपये विनातारण कर्ज वाटप केल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, एकत्रित आयुष्यमान भारत योजनेतून गत आर्थिक वर्षात जिल्ह्यात सुमारे २७ हजार रूग्णांच्या उपचारापोटी १३७ कोटी रूपये अनुदान देण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून दोन हजार रुग्णांना सुमारे १४ कोटी ४० लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हा नियोजनच्या निधीमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचे बळकटीकरण करण्यात येत आहे.
यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, महिला व कन्या सबलीकरणांतर्गत उपक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, माझी शाळा आदर्श शाळा अंतर्गत ४४९ शाळांमध्ये एआय, रोबोटिक्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी लॅबसारख्या आधुनिक सुविधा, उपसा सिंचन योजना आदिंमधील कामगिरीची नोंद घेत ई-गव्हर्नन्स व माझी वसुंधरा अभियानात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल जिल्हा परिषद यंत्रणांचे कौतुक केले.
स्वगणनेचे आवाहन
यावेळी पाटील यांनी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम म्हणजेच एस आय आर यामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तसेच जनगणना २०२७ अंतर्गत 1 ते 15 मे या कालावधीत संकेतस्थळावर जावून नागरिकांनी स्वगणना करावी, असेही ते म्हणाले. वाढते तापमान व हवामान विभागाने कमी पर्जन्यमान होण्याचा अंदाज दिलेला असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असेही ते म्हणाले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदान आणि बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, पोलीस बँड, श्वान, निर्भया, बाँब शोधक व बाँब नाशक पथक, शीघ्र प्रतिसाद दल, मोबाईल फॉरेन्सिक लॅब व्हॅन, अग्निशमन, दंगल नियंत्रक पथक आदि पथकांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी, मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गुणवंतांचा गौरव
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2025 करिता पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोलीस हवालदार सागर टिंगरे, अमिरशा फकिर व भावना सुतगुंडे, उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, पोलीस निरीक्षक अरूण सुगांवकर, पोलीस हवालदार श्रीपाद शिंदे व सिकंदर तांबोळी, पोलीस निरीक्षक विशाल टकले, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील, चिंचणी-वांगी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच आदर्श ग्राम महसूल पुरस्कार उपविभाग आटपाडी ग्राम महसूल अधिकारी माणिकराव देशमुख, विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार-2025 महिला पोलीस जयश्री ताटे, माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उच्चतम कामगिरीबद्दल बोरगाव, कासेगाव, येडेनिपाणी, आळसंद, वाळेखिंडी, नांगोळे, लंगरपेठ, पिंपळवाडी, पेठ, सलगरे, अग्रण धुळगाव, अलकूड या ग्रामपंचायतींना, जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड झालेल्या समाजसेविका अरूणा पाटील, मनीषा देशपांडे, साधना पाटील, नीला देशपांडे, महानगरपालिका कार्यक्षेत्रात हिवताप साथ आटोक्यात आणल्याबद्दल डॉ. महिंद्र जगताप, डॉ. संजय रणवीर, डॉ. सूचेता पवार, डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रविणकुमार पाटील, डॉ. अंजली धुमाळ, डॉ. श्रध्दा चौधरी, शिवाजी यादव, निगार पठाण, स्वाती सुतार, सुरेश वनखंडे, विनायक कुडचे, अजिंक्य घाडगे, किरण पाटील, सुरज वाघमोडे, मुख्तार नदाफ, अनिल खराडे, कल्पना पाटील, शारदा पाटील व सुनिता लवटे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.