खरीप हंगामात आपल्या शेतकरी बांधवांना खतांची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने ‘बफर स्टॉक’ सज्ज ठेवावा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

8

सांगली : सांगली जिल्ह्यातील आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय नियोजन बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून, बियाणे आणि खत पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. खरीप हंगामात आपल्या शेतकरी बांधवांना खतांची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने ‘बफर स्टॉक’ सज्ज ठेवावा, अशा स्पष्ट सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर आणि बाजरी या प्रमुख पिकांच्या क्षेत्राचा अचूक आढावा घेऊन बियाण्यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांची नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या.

डिजिटल कृषी क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकत असताना, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ‘फार्मर आयडी’ तयार करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर जमिनीचा पोत टिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि देशी बियाण्यांचा वापर वाढवणे यावर आमचा विशेष भर राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

यंदा ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भूगर्भातील पाणी पातळी आणि धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करून सिंचनाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या महत्त्वाच्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांच्यासह खासदार विशाल पाटील, माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर आणि कृषी व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बळीराजाला खंबीर पाठबळ देण्यासाठी आमचे सरकार आणि प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.